देणं कोरोनाचं...


        

       या पृथ्वीतलावरची कोणतीही गोष्ट ही तुम्हाला सतत काहीतरी देत असते, मग ती गोष्ट निर्जीव असो किंवा सजीव. या कोरोनाचं सुद्धा काही वेगळं नक्कीच नाहीये. आता कोरोना असं साधं उच्चारलं तरी तुम्हाला ते नको होणार हे नक्की झालंय. त्याबद्दल अधिक काय बोलायचं ?

      खरंतर उघड्या डोळ्यांनी न दिसणारा ह्या इवल्याशा विषाणूने आपली निराळीच दहशत पसरवून ठेवली आहे. खरंतर हा विषाणू पसरला की पसरवला गेला ही एक वेगळी आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता तुम्ही म्हणाल की, तू इतकं सांगतोयस तर तुला काय दिलं कोरोनाने. तर याच प्रश्नाचं उत्तर घेऊन मी आज तुमच्यासमोर आलोय. ज्या गोष्टी मला आज तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत त्या सांगण्यासाठी आलोय.  

     आज चार महिने झाले मीच काय तुम्हीसुद्धा घरात बसून आहात कारण काय.. अहो लॉकडाऊन शुद्ध मराठीत टाळेबंदी! स्वतःचे डोळेसुद्धा पूर्णपणे न उघडू शकणाऱ्या त्या देशाने जगाला आपल्या घरात बसायला भाग पाडलं. सगळ्यात पहिलं मला कोरोनानं काय दिलं तर खूप सारा कंटाळा. मान्य आहे घर स्वतःच आहे; पण त्याच घरात नुसतंच बसून बसून एक दिवस कंटाळा येतो हेही तितकंच खरं आहे. सुरुवातीला एक महिना काहीही वाटलं नाही,  म्हणलं चला खूप दिवसांनी एक मोठा ब्रेक मिळाला आहे. पण महिन्यानंतर हे सगळं खूप बोअर झालं आणि भयंकर असा कंटाळा यायला चालू झाला. मग जर त्या कोरोनाकडून मला काही मिळालं असेल तर तो म्हणजे राग. म्हणजे जो आधीही येतच होता पण या काळात जरा जास्तीच यायला लागला. वास्तविक माझ्या सारख्या फिरस्त्याला घरात बसून राहणे हे मुळी मान्यच नाही , पण जीवासाठी घरी बसावं लागतं. आणि मग हा जीव घरात असलेल्या इतर जीवांचा रागराग करायला सुरु करतो. अहो करणार काय घरी बसल्याचा परिणाम. तुम्हालाही असे अनुभव आलेच असतील की…

      कोरोनाने आपल्याला बहाल केलेली अजून एक गोष्ट म्हणजेच त्याची स्वयंघोषित दहशत. जरी याचा प्रादुर्भाव जगभरात वाढत असला तरी त्याला घाबरून जाण्यात काहीच अर्थ नाही असं मला स्वत:ला वाटतं. पण याची भीती वाटण्यामागचं कारण म्हणजे याच्यावर अजुनपर्यंत लसच निर्माण झालेली नाही. पण स्वत:ने स्वतःची काळजी घेण्याबरोबरच इतरांची काळजी घेतली तर त्यात घाबरण्याचं कारणच उरत नाही. आणि यानंतर कोरोनाने एक गोष्ट दिली ती म्हणजे ताण, टेन्शन . म्हणजे हे सगळं काय आहे ?, हे सगळं कधी संपणार?, आपण चार महिने घरी बसून आहोत, हे का झालं ? अशा एक न अनेक गोष्टी मनात येतात आणि आपण त्या गोष्टीबद्दल विनाकारण विचार करायला लागतो.

       आता ह्या झाल्या थोड्या नकारात्मक गोष्टी ; पण मला कोरोनाने काही चांगल्या गोष्टीसुद्धा दिल्याच की म्हणजे तो एक घातकी विषाणू जरी असला तरी त्याने मला दिलेल्या चांगल्या गोष्टींचे कौतुक करायलाच हवं, नाही का!

     सर्वप्रथम मला कोरोनाने मला माझ्या कुटुंबाबरोबरचा एकत्र सहवास दिला. होतं काय बहुतेकवेळा आपण शिक्षणाच्या ,नोकरीच्या किंवा इतर कोणत्याही कामानिमित्त इतर गावात असतो त्यावेळी आपल्याला असा कुटुंबाचा दीर्घकालीन एकत्रित सहवास लाभत नाही. मात्र या लॉकडाऊन मध्ये मला काय पण आपल्यापैकी सर्वांनाच मिळाला असेल. या काळात कुटुंबाबरोबर एकत्र गप्पागोष्टी , मौजमजा करणं ही एक वेगळीच मजा आहे. आणि या गोष्टीला प्रत्येकाने तेवढंच एन्जॉय करायला हवं त्याचा तितकंच आनंद घ्यायला हवा.    

    त्यानंतर कोरोनाने लॉकडाऊनच्या माध्यमातून अजून काही दिले असले तर ते म्हणजे भरपूर मोकळा वेळ. या वेळेचा सदुपयोग आपल्याला कितीतरी मार्गाने करता येईल. या काळात तुम्ही तुमच्यातला एक लपलेला कलाकार शोधू शकता जो तुम्हाला कधी बोअर होऊ देणार नाही, जो नेहमी त्या कलेच्या माध्यमातून एक आनंद शोधेल. जसा माझ्या आत लपलेला एक लेखक या काळात अधिकच समृद्ध झाला. तसा तुमच्या मधला देखील कलाकार तुम्हाला समृद्ध करून जाऊ शकतो. या काळात तुम्ही व्यायाम करू शकता , एक चांगलं शरीर कमाऊ शकता ,आपल्या शरीराबरोबर मेडिटेशन करून मनाचं आरोग्यदेखील उत्तम ठेऊ शकता. कधी स्वयंपाक केला नसेल तर ती कलादेखील तुम्ही या काळात शिकू शकता. पोळी लाटताना पहिल्यांदा त्याचा झालेला नकाशा ते गोलाकार पोळी हा प्रवास मुळातच गमतीशीर आणि आनंददायी आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आनंद देतील.

        शेवटी काय वर दिलेल्या काही नैराश्यदायक गोष्टींकडे लक्ष न देता आपण आपली काळजी आणि आपल्याला आनंद देणारं काम करत राहिलं  तर आपल्याला काहीही होत नाही. कोरोनाला घाबरू नका पण हलक्यानेदेखील घेऊ नका. आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद !!     

#घरी_रहा #सुरक्षित_रहा                                                                  

 


Comments