सावरकर आणि गांधी

                    सूर्याची उबदार प्रखरता , वाऱ्याचा वेग , खडकालाही  हेवा वाटेल अशी कठोरता आणि साक्षात बृहस्पतीनेदेखील शिष्यत्त्व पत्करावं  इतकी बुद्धीची प्रगल्भता आणि या साऱ्याचा मिळून बनलेला मानवी आकार म्हणजे तात्याराव सावरकर.  खरंतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या एकमेवाद्वितीय व्यक्तीबद्दल मी पामर काय लिहिणार ? तरीही त्यांच्या निस्सीम आदरापोटी केलेला हा एक इवलासा प्रयत्न. स्वातंत्र्यवीरांबद्दल लिहिणे किंवा विचार मांडणे हे म्हणजे एका अथांग महासागरात पेलाभर पाणी ओतल्यासारखेच आहे असे मला व्यक्तिशः वाटते. 
                   प्रत्यक्षात स्वा . सावरकर आणि महात्मा गांधी हे काही कुणी परस्पर शत्रू नव्हते , त्यांनी कधीही एकमेकांचा द्वेष केला नाही , किंवा तिटकारा केला नाही; एकमेकाला पाण्यात पाहायचा प्रयत्नदेखील केला नाही. मात्र त्यांच्या परस्पर विचारधारा मात्र नक्कीच वेगवेगळ्या होत्या. विचारांच्या देवाणघेवाणी व्हायच्या , मतभेद व्हायचे , परंतु त्यांचे परस्परांमधील संबंध बिघडले नाहीत , किंवा विकोपाला गेले नाहीत. स्वातंत्र्यवीरांना महात्मा गांधी मान्यच नव्हते असे अजिबातच नव्हते, ते एकमेकांच्या विचारांना तितकाच सन्मान द्यायचे .भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे नेते बनलेले गांधी हे मुसलमान व ख्रिश्चनांबद्दल सर्वसमावेशक वृत्ती असलेले शांततावादी होते. हिंदू महासभेचे नेतृत्व करणारे सावरकर हे हिंदुत्व किंवा हिंदू-नेस-या हिंदुत्वाची कल्पना भारतीय अस्मितेपासून अविभाज्य आहे असा विश्वास बाळगणारे दक्षिणपंथी प्रमुख होते.
              स्वातंत्र्यवीरांनी आपल्या एका विचाररत्नात  लिहून ठेवले आहे की  ,
           “ सापेक्ष हिंसा पुण्य आहे तर,
            आत्यंतिक अहिंसा पाप आहे .”
           तसे पाहायला गेलं तर हे एक फक्त ९ शब्दांचे एक वाक्य आहे , पण याच्या अंतरी खूप मोठा अर्थ , खूप मोठा संदेश स्वातंत्र्यवीरांनी देऊ केलेला आहे. कोणत्याही गोष्टीला एक मर्यादा असते म्हणतात आणि ती गोष्ट अति झाली की याची माती होते , मग तीच मर्यादा अहिंसेला का असू नये ? आत्यंतिक अहिंसा कधीही त्रासदायकच ठरेल.
            महात्मा गांधींनी जगाला एक मूलमंत्र दिला सत्याचा, शांतीचा , अहिंसेचा . मान्य  आहे अगदीच मान्य आहे कि या तिन्ही मूल्यांची गरज आहे , त्यातून समाजाचे भलेच साधले जाईल यात वादच नाही . परंतु जर मायदेशावर परकीय आक्रमणे होत असतील आणि जर भयावह प्राणांतिक जीवित हानी होत असेल तर ती अहिंसा काय कामाची ? अशावेळी ती एका बाजूला काढून ठेवलेलीच बरी.जगद्गुरूतुकाराम महाराजांनी सुद्धा एका अभंगात म्हणून ठेवलं आहे:
        भले तरी देऊ कासेची लंगोटी ।
        नाठाळाचे माथी हाणू काठी ।।
झालेल्या अन्यायाचा विरोध , त्याचा प्रतिकार झालाच पाहिजे. सगळ्याच लढाया काही शांततेचा , अहिंसेचा मार्ग अवलंबून सुटत नसतात.
         गांधीस्वातंत्र्यवीरांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फार मोठा प्रभाव होता. त्यांनी त्यांच्या एका वाक्यात अतिशय अर्थपूर्ण व सुंदर वाक्य लिहून ठेवले आहे , ते म्हणतात की
         “युगधर्म ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी सरस्वतीचे रक्षणार्थ भवानी उचलली म्हणून तर आज महाराष्ट्र आहे .  ” खरंतर हे वाक्य स्वतःच खूप काही सांगून जाते. याच अतीव अहिंसेपोटी जर त्यावेळी छत्रपतींनी भवानी तलवार उचललीच नसती , ५ -५ पातशाह्या उलथवून लावल्या नसत्या  तर खरंच आज काय चित्र असते हो ? त्यावेळी जर छत्रपतींनी मैदान-ए-जंग मध्ये तलवार म्यान  केली असती तर समस्त महाराष्ट्राच काय झाले असते. हा मोकळेपणाचा , स्वातंत्र्याचा श्वास आपल्याला घेताच  आला नसता. आपल्याला कुणाचीतरी गुलामी पत्करणं भाग पडले असते.   
महात्मा गांधींनी स्वातंत्र्यवीरांचे वर्णन “भारतमातेचा विश्वासू व बहाद्दूर असा पुत्र” असे केले आहे. महात्मा गांधीजीनी आत्मसात केलेल्या मूल्यांपैकी काहीअशी आहेत जी खरंच प्रत्येक भारतवासियाने अंगिकारली  पाहिजेत.उदाहरण द्यायचे झाल्यास आत्मविश्वास, चिकाटी, क्षमाशीलता हि काही  कमालीची मूल्ये आहेत ज्यांतून काहीतरी बोध घेऊन ती अंगीकारणे खूप महत्वाचे आणि गरजेचे आहे.

Comments

Post a Comment