वसा समाजसेवेचा !!




उठ माणसा जागा हो ,समाजसेवेचा धागा हो !!
               १८ ते २० उंबऱ्यांचे एक गाव  ,वास्तविकता लक्षात घेतली तर त्याला गाव म्हणता येणार नाही, वनहाटी  एक आदिवासी पाडा. पाड्याची लोकसंख्या जेमतेम १०० ते १२०. हा आदिवासी पाडा  मावळ तालुक्यात लोणावळ्याच्या थोडे पलीकडे असलेल्या राजमाची किल्ल्यानजीकच्या डोंगराळ भागात वसलेला आहे. या पाड्यातील लोकांचा उपजीविकेचा मुख्य असा कोणता स्त्रोत नाही. ज्या धरणाच्या कामासाठी हा पाडा स्थलांतरित झाला त्याच धरणात मासेमारी करायची, खेकडे पकडून विकायचे हेच काय ते यांचे मुख्य काम तेही पावसाळ्याचे चार महिने. हा भौगोलिकरित्या दुर्गम असल्याने येथे तितक्याशा रोजगाराच्या संधीही उपलब्ध नाहीत. प्रसंगी ओझी वाहायचे , बिगारी करायचे काम या लोकांना करावे लागते. खरे सांगायचे झाले तर या गावात वीजच काही महिने पूर्वी दाखल झाली. कित्येक वर्षे हा पाडा तसा अंधारातच होता. काही सामाजिक संस्थांच्या वतीने झालेल्या मदतीत या पाड्याला काही सौर दिवे देण्यात आले . सकाळी खायला मिळाले तर रात्री मिळेल काय ? अशी परिस्थिती आजही इथे पाहायला मिळते. इथल्या रहिवाशांची प्रमुख अडचण ही  शिक्षण आहे आणि त्याचबरोबर उदरनिर्वाहाचे साधन.   
              आमचं ‘हिंदुत्व प्रतिष्ठान’ सन २०११ साली स्थापन झाले. “अभावातून प्रभावाकडे ” या एकाच तत्त्वाकडे लक्ष्य केंद्रित करून प्रतिष्ठान गेली ८ वर्षे त्याच जोमाने आणि जिद्दीने कार्यरत आहे. यंदाचा प्रतिष्ठानच्या सामाजिक सप्ताहातील शेवटचा कार्यक्रम इथे घेण्यात आला. विशेष म्हणजे यंदाचा प्रजासत्ताक दिन आम्ही त्या पाड्यावर त्या लोकांसोबत साजरा केला. समाजातील  वंचित घटक लक्षात घेणे व त्यांना एका विशिष्ट अशा उंचीवर पोहोचायला हातभार लावणे हे काम प्रतिष्ठान पहिल्यापासूनच करत आलेले  आहे. १८ घरांना उपयुक्त असा किराणा माल, चादरी तसेच इतर अनेक उपयोगी वस्तूंचे वाटप तेथील ग्रामस्थांना करण्यात आले. तसेच तेथील शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर,वह्या ,पाण्याची बाटली , पाऊच, पेन्सिली  अशा शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले .
               त्या पाड्यावरचे त्याहून आश्चर्य म्हणजे इथे कोणत्याही कुटुंबाकडे  कोणतेही वाहन नाही, जिकडे जायचे  तिकडे  पायपीट हा एकच उपाय. दोन वर्षांपूर्वी या पाड्यावर प्राथमिक शाळा सुरु झाली. १०० ते १२० पैकी ८ एवढा शाळेचा पट आहे. पाड्यावर ४थीच्या पुढे शाळाच नाही. शाळेचे सर्वेसर्वा शिक्षक श्री. केंगले सर इथे दोन वर्षांपासून अत्यंत हिरीरीने कार्यरत आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच  पाड्यावर  अनेक सेवासंस्था भेट देऊन मदतीचे हात पुढे करत असतात. श्री.केंगले सरांना प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यंदाचा आदर्श गुरुजन हा पुरस्कार दिला गेला. त्यांच्या त्या निर्व्याज आणि त्यागी वृत्तीला आमचा सलाम.
यंदाचा प्रजासत्ताक दिन हा प्रतिष्ठानच्या प्रत्येक सदस्यासाठी नक्कीच खास होता. या कार्यक्रमाला सदस्यांनी मोठया प्रमाणावर आपला सहभाग दर्शवला. आपण रहात असलेल्या समाजाचे आपण  कुठेतरी देणेकरी लागतो , त्यासाठी आपण काहीतरी नक्कीच करायला हवे ही भावना सगळ्यांच्याच मनात पुन्हा एकदा उद्दीपित झाली.   

Comments