छत्रपती
छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राच्या मातीला पडलेले एक धगधगते सुवर्णस्वप्न. श्रीमन्महाराजांच्या प्रेरणादायी आणि अथांग सागराप्रमाणे असलेल्या जीवनाविषयी , त्यांच्या चरित्राविषयी मी पामर ते काय लिहिणार ? त्यांच्या सागराप्रमाणे असलेल्या चरित्रातील काही गोष्टींची ओंजळ मी आपल्यासमोर रिती करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय!!
१९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरीवर शिवबाचा जन्म झाला ; जणू नव्या नवलाईचा सूर्यनारायण अमर्याद, निरभ्र अशा आकाशात तळपू लागला.शिवबा जन्मले आणि यवनांच्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या मायमराठी धरीत्रीने सुटकेच्या विश्वासाने एक नि:श्वास सोडला. शिवजन्माच्या दरम्यानच्या काळात आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही यांच्यासारख्या पातशाह्या मराठी मुलुखावर हैदोस घालत होत्या. रोज नवनवीन आक्रमणे व्हायची आणि कित्येक मराठी मुलुख नव्याने होरपळून निघायचे, गावकऱ्यांना पळता भुई थोडी व्हायची, आयाबहिणींची अपहरणे व्हायची. हे सगळे घडत असतानाच बालशिवाजी जिजाबाईंच्या अंगाखांद्यावर खेळत असतानाच या सगळ्या पातशाह्या उलथवून लावण्याची शक्ती आणि युक्ती शिकत होता. दिवसेंदिवस शिवबा मोठा होत होता धरीत्रीच्या किंकाळ्या ऐकत होता.
स्वराज्याचा विचार सर्वप्रथम आला तो शहाजीराजेंच्या मनात म्हणूनच त्यांस स्वराज्यसंकल्पक म्हणूनदेखील ओळखले जाते. अगदी पोरवयात असतानाच आपल्या तान्हाजी मालुसरे , दादाजी नरसप्रभू मुरारबाजी देशपांडे , बाजी पासलकर अशा शेलक्या गड्यांसह शिवबांनी रायरेश्वरी आपल्या हाताच्या डाव्या करंगळीच्या रक्ताने महादेवाला अभिषेक घातला आणि स्वराज्यसंस्थापनेच्या शपथेने उपस्थितांनी अवघा रायरेश्वराचा परिसर दुमदुमून सोडला. अन मग हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले गेले तोरणा किल्ला जिंकून. शिवबांनी मग हिरडस , गुंजण अशा मावळातून आपले सवंगडी , आपले मावळे जमा करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात आदिलशाही आणि निजामशाही कडून मावळातल्या सरदारांना वतनदारी दिली जायची. वतनदारी म्हणजे तरी काय हो राजेशाही थाटातली गुलामीच ती! अशावेळी अशा वतनदारांच्या मनात स्वराज्यविचार बिंबवायचे काम शिवबांनी अगदी लीलया केले. राजे दादोजी कोंडदेवांच्या तालमीत चांगलेच तयार होत होते, ढाल, तलवार ,पट्टे, भाले त्यांचे नवे सवंगडी बनत होते.
जसे शिवराय मोठे होत होते तसे जिजाबाईंच्या मनात शिवरायांचे दोनाचे चार हात करायचे विचार फेर धरू लागले. आणि मग पुढे फलटणच्या निंबाळकरांची लेक सई भोसल्यांची सून झाली. तशाच पुढे सोयरिकी जुळत गेल्या आणि शिवरायांचा राणीवसा मोठा झाला. शिवरायांना सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, सकवारबाई, गुणवंताबाई, लक्ष्मीबाई, काशीबाई, सगुणाबाई अशा ८ राण्या होत्या.खरंतर त्या काळी राजांना बहुभार्या असणे हे रीवाजाचेच होते. शिवरायांच्या अशा सोयरिकिंमुळे त्याचा स्वराज्याला खूप हातभार लाभला होता.
महाराजांना स्वराज्य उभारणीसाठी एक गोष्ट नेहमी उपयोगी पडली ती म्हणजे ‘गनिमीकावा’. हे छुपे परंतु तितकेच परिणामकारक ठरलेले शस्त्र शिवबा महाराजसाहेब म्हणजेच शहाजीराजेंकडून शिकले. शहाजीराजे यांच्याकडे जरी पुणे-सुपे हा परगणा असला तरी महाराजसाहेबांचा मुक्काम हा बंगळूरला असायचा, शिवबांचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजे हेसुद्धा महाराजसाहेबांबरोबर तिकडेच होते.
महाराजसाहेब जेव्हा पाहणी करण्यासाठी पुण्याला येत तेव्हा शिवबांना सोबत घेऊन जात व दख्खनच्या सौंदर्याची ओळख करून देत. त्या सोंदर्य न्याहाळण्याचा फयदा पुढे शिवबांना पावलोपावली झाला. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळून शत्रूला तिथे आणून त्यांच्यावर कशी मात द्यायची हे शिवरायांनी सर्वांनाच दाखवून दिले. महाराजांच्या रणनीतीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे राजांनी एक विशिष्ट मावळा वारंवार कधीच वापरला नाही. उदाहरणार्थ सांगायचे झाले तर प्रतापगडावरच्या रणसंग्रामावेळीचा जीवा महाला, पुरंधरवेळचा मुरारबाजी, “आधी लगीन कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे ”म्हणून कोंढाण्याची जबाबदारी घेणारा तान्हाजी अशी कितीतरी उदाहरणे समोर येतील. पाच पाच पातशाह्यांची नाडी महाराजांनी बरोबर ओळखून ठेवली होती. मुघलसाम्राज्य हे विस्ताराने मोठे होते आणि त्यांचे सैन्यही तितकच अफाट. पण हे सैन्य बरोबर सह्याद्रीच्या कुशीत यायचे आणि शिकस्त खाऊन माघारी जायचे. भूखंडावर जसा स्वराज्याचा वचक बसत होता तसाच पोर्तुगीजांना , जंजिरयाच्या सिद्दीला टक्कर देण्यासाठी महाराजांनी आरमाराची उभारणी केली. महाराजांना त्यामुळे “भारतीय आरमाराचे जनक” म्हणून ओळखले जाते.
महाराजांनी जितकी युद्धे तलवारीने मारली तितकीच बुध्दीने!! औरंगजेब जेवढा दुष्ट होता तेवढाच धुर्तदेखील. त्याने आपला हिंदू सरदार मिर्झाराजे जयसिंग यालाच मोठी कुमक देऊन महाराजांवर चाल करून पाठवला. अशावेळी महाराजांना युद्ध करणे अशक्य होते असे नव्हते पण महाराजांनी जाणले होते की इथे तलवारीच्या वारापेक्षा बुद्धीचा वार केव्हाही लाखमोलाचा ठरेल. म्हणून महाराजांना मिर्झाराजे जयसिंगाबरोबर पुरंदरचा तह करावा लागला. यामध्ये स्वराज्यातले २३ किल्ले आणि ४ लक्ष होनांचा प्रदेश महाराजाना तहात द्यावा लागला. पण नंतर महाराजांनी काळानुरूप त्या किल्ल्यांबरोबरच एकूण ३५० हून अधिक किल्ले स्वराज्यात आणले.
महाराजांना अवघे ५० वर्षांचे आयुष्य लाभले पण त्या ५० वर्षांत महाराजांनी अशी कामे केली की आजही ३५० वर्षानंतर सुद्धा “मरावे परि कीर्तीरूपी उरावे” या उक्तीनुसार मनामनात आणि नसानसात राजे आजही जिवंत आहेत. छत्रपती शिवरायांनी एक आदर्श राज्य कसे असावे आणि एक आदर्श शासक कसा असावा याचा वस्तुपाठ आपल्यासाठी घालून दिला. एकीचे बळ म्हणजेच संघटनाचे बळ , त्याची शक्ती आणि आपल्या हक्काचा असलेला गनिमीकावा वापरून कितीही बलाढ्य असलेल्या शत्रूला पाणी कसे पाजायचं हे आपल्या कार्यातून त्यांनी सबंध जगाला दाखवून दिले. "शत्रू कितीही बलाढ्य असेल तर त्याची कमी ओळखा त्याचे पांगळेपण ओळखा आणि तिथे घाव घाला, त्याचा पराभव निश्चित आहे" ही श्रीमन्महाराजांची शिकवण होती.



Comments
Post a Comment