छत्रपती आणि Quarantine Life

                   

                 छत्रपती शिवाजी महाराज एक महामहोत्तम महापुरुष , महाराष्ट्राच्या पवित्र मातीला पडलेले एक धगधगते सुवर्णस्वप्न.  हे छत्रपती शिवराय अनंत ब्रम्हांडाप्रमाणे अगाध आपले चरित्र आम्ही पामर त्यावर काय बोलणार .म्हणून आपल्या चारीत्रसागरातील अमृताचा एक थेंब उचलून आपला एक अल्पमती भक्त म्हणून वाटण्याचा प्रयत्न करीत आहे.

                    महाराज  तुम्ही आमच्या कायमच स्मरणात असता, परंतु या घडीला क्षणोक्षणी तुमची आठवण येते. आपल्या  महाराष्ट्रासकट भारतावर नव्हे तर सबंध जगावर हा ‘कोरोना’रूपी शत्रू  थैमान घालतो आहे, जगाच्या छातीवर पाय ठेऊन थयाथया नाचतो आहे. महामारी म्हणून घोषित झालेल्या या रोगाने जगभरात लाखो जणांचा बळी गेला. याचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कारणाने केंद्र तसेच राज्य सरकारने टाळेबंदी म्हणजेच लॉकडाऊन  घोषित केले. लोकांच्या वर्दळीच्या अभावी रस्ते, समुद्रकिनारे एक  मोकळा श्वास घेतायत. आणि आम्ही आमचे Quarantine Life जगत आहोत .या फावल्या वेळात करायचं तरी काय म्हणून पुस्तके वाचायला सुरुवात केली. आपल्या विस्तीर्ण अशा चरित्रावर आधारित  श्रीमान योगी, शिवकाळ, जाणता राजा, अशी अनेक पुस्तके सध्या वाचनात आहेत. आपलं चरित्र शब्दरुपाने रोजच डोळ्यासमोर येतय. पण आमचं  Quarantine Life चालू असताना आम्हाला तुमचं Quarantine Life वारंवार आठवते. आयुष्यात एकांत आणि एकांतवास किती महत्वाचा आहे हे आपल्या चरित्रातील काही प्रसंगांवरून लक्षात येते.

             आज प्रकर्षाने आठवतो तो प्रतापगड आणि तो प्रतापगडचा रणसंग्राम.  विजापूर दरबारातला महाबलाढ्य सरदार अफझलखान ज्याने महाराजांच्या थोरल्या बंधूंना म्हणजेच संभाजी महाराजांना कपटाने ठार मारले होते तो  भयंकर अशा फौजेसह  आपल्याला ‘उभ्या घोडीयानिशी पकडतो ’ म्हणून विडा उचलून आला आणि आपल्या जावळी खोऱ्यातल्या वाईला ठाण मांडून बसला. तसा तो पूर्वीचा वाईचा सुभेदार , त्याला वाईच्या मुलुखाची खडानखडा माहिती होती. त्याने येतायेता हिंदू लोकांचे पवित्र असे देवस्थान आणि महाराजांचं कुलदैवत श्री. तुळजाभवानी देवस्थानाला  इजा पोहोचवली, त्याचबरोबर इतरही देवस्थाने बेचिराख केली. पण त्या वेळचं पातशाही सैन्य आपल्या सह्याद्रीच्या कुशीत यायचं खरं पण सह्याद्रीच रौद्र रूप पाहून शिकस्त खाऊन जायची आणि मराठ्यांची फत्ते व्हायची. आता आपले Quarantine Life सुरु झाले होते. खानाला जेरीस आणून कसा ठार करायचा की त्याच्याबरोबर तह करायचा असे अनेक विचार आपल्या दिमागात येऊन आदळत होते. खानाचा खुर्दा कसा उडवायचा याचा विचार आणि निर्णय होत होता. वाईत येऊन खानाला वेळ होत होता ; आता मात्र खानाचा काय तो सोक्षमोक्ष लावावा या विचाराने महाराजांनी खानाला भेटण्याचे ठरवले. महाराज आपण ठरवले असते तर आपण खानाकडे जाऊ शकला असता ; पण वेळीच आपण खानाचा कपट ओळखलात व त्यालाच प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलवून त्याचा यथायोग्य समाचार घेऊन त्याला यमसदनी धाडलेत.

           त्यानंतर आठवतो तो सिद्दी जौहरने दिलेला पन्हाळ्याचा वेढा. आता  गडाला वेढा पडला म्हणजे गडावरचं येणंजाण बंद , ठीकठिकाणी चौक्या-पहारे. कित्येक महिने पन्हाळ्याचा सिद्दीचा वेढा तसाच होता. अशावेळी एखादा सामान्य माणूस असता तर त्याची इथे धडगत राहिली नसती. पण महाराज आपण आपल्या बुद्धीचातुर्याने त्याला तिथेच खिळवून ठेवला. वेढा काही के,या उठतच नव्हता, गडावरची सैन्याची रसद संपत चाललेली होती. तरी इथे शांततेचा वार हा जास्त मोलाचा होता, इथे जराजरी घाई झाली असती तर लाखोंच्या पोशिन्द्याचा प्राण पणाला लागला असता. अशावेळी महाराजांनी खूप विचार केला व तहातून बाहेर पडण्याची योजना आखली आणि त्या योजनेला  महाराजांसह सर्व मावळ्यांनी कृतीची साथ दिली आणि महाराजसुखरूप वेढ्यातून बाहेर पडून  राजगडावर प्रवेश करते झाले.      

           महाराज आज तुमच्या शिकवणी मनात फेर धरतायत. तुमच्या विचारांनी आम्हाला या रोगाचा आग्या मोहोळ जाळून टाकण्याच बळ  मिळतय. आपल्या हक्काचा असलेला गनिमीकावा वापरून कितीही बलाढ्य असलेल्या शत्रूला पाणी कसे पाजायचं हे आपल्या कार्यातून त्यांनी सबंध जगाला दाखवून दिले.  "शत्रू कितीही बलाढ्य असेल तर त्याची कमी ओळखा त्याचे पांगळेपण ओळखा आणि तिथे घाव घालात्याचा पराभव निश्चित आहे" ही श्रीमन्महाराजांची शिकवण आम्ही अशीच कायम लक्षात ठेऊ.       

                                       



Comments