कोरोनाच्या भीतीतून कसं बाहेर पडायचं ???

            नमस्कार, सध्याच्या या कोरोना वैश्विक महामारीच्या परिस्थितीत आपण सर्व आपली व आपल्या प्रियजनांची काळजी घेऊन मजेत असाल अशी आशा आहे. साधारणपणे  तीन ते चार  महिने झाले असतील कोरोनाचा महाराष्ट्रासह भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. दररोज बाधितांचे नवनवीन आकडे समोर येत आहेत. त्यामुळे एकंदरीत कोरोनाची एक भीती पसरलेली आपल्याला दिसून येते ज्यामुळे मानसिक ताणतणाव वाढत आहेत.

प्रामुख्याने कोरोनाची भीती पुढील दोन कारणांमुळे निर्माण होते:

१.     कोरोना माझ्या वसाहतीत येऊन थबकेल काय ?

२.    मला स्वतःला कोरोनाचा धोका आहे का ?

खरंतर अशा परिस्थितीत कोरोनाला न घाबरता योग्य ती दक्षता व सावधानता बाळगणे हे महत्वाचे ठरते.

कोरोनाच्या प्रादुर्भावाची भीती किंवा चिंता कमी करण्यासाठी काय काय करता येईल या गोष्टीवर आपण प्रकाशझोत टाकणार आहोत.

A.  १ .समाज माध्यमे आणि प्रत्येक मिनिटाला प्रसारित होणाऱ्या बातम्यांपासून दूर रहा-

आजकाल प्रत्येक व्यक्ती ही WhatsApp, Facebook, Twitter, Instagram इत्यादी समाजमाध्यमांवर सक्रीय आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात घडत असणाऱ्या गोष्टी माणसाला इंटरनेटमुळे एका क्लिकवर उपलब्ध आहेत. जेव्हापासून चीनमधल्या वूहानमध्ये कोरोनाचा परिणाम दिसायला सुरुवात झाली तेव्हापासून अशा बातम्यांना वेग आलेला आहे. अशावेळी सगळ्याच बातम्या खऱ्या असतील असे नाही. त्यामुळे सगळ्याच गोष्टींवर विश्वास न ठेवता  समाजमाध्यमांवर प्रसारित कोरोनाच्या बातम्या बघणे कमी करावे.

B.  २.स्वतःला माहिती देत रहा-

कोरोना वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर बाधितांची व मृतांची आकडेवारी वारंवार समोर येत असते. अशावेळी कोणतीही भिती मनात न ठेवता त्याची योग्य ती माहिती तुमच्याजवळ ठेवा. स्वतःला अद्ययावत ठेवा पण कोणत्याही गोष्टीने घाबरून जाऊ नका. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा दर, होणाऱ्या चाचण्यांचे आकडे हे पडताळा करून त्यांची तुलना करणे गरजेचे आहे. उदा. भारताची लोकसंख्या ही जवळपास १३० कोटी इतकी असून भारतात आत्तापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही ३०६६० इतकी असून भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत ती कितीतरी कमी आहे. त्यामुळे घाबरण्यात काहीच अर्थ नाही.       

C. ३. तथ्य जाणून घ्या-

सध्या कोरोना वैश्विक महामारीच्या संदर्भात अनेक गोष्टी समाज माध्यमांमध्ये वाऱ्याच्या वेगाने फिरत आहेत. यातल्या सगळ्याच गोष्टींच्या सत्यतेची खात्री देता येत नाही. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेसारख्या (WHO) प्रतिष्ठित माध्यमांतून मिळालेली माहिती सत्य समजावी किंवा ग्राह्य धरावी. बाहेरून आलेल्या कोणत्याही गोष्टीने ताण घेऊन घाबरून जाऊ नये.

 ४.काळजी न करण्याची करणे मनाला पटवत रहाणे –

मानसशास्त्रीयदृष्ट्‍या माणसाचं मन हे चंचल असतं .त्यामुळे माणूस सहज कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवतो. आणि गोष्ट जरा गंभीर असेल त्याची माणसाला चिंता व भिती वाटू लागते. त्यामुळे अशा गोष्टी जाणीवपूर्वक टाळण्यात याव्यात किंवा अशा गोष्टींचा जास्त विचार कण्यात येऊ नये. आपल्याला ज्या गोष्टींच्या विचारामुळे त्रास होत नाही किंवा काळजी वाटत नाही अशा गोष्टींचा विचार करत राहणे.

५.एक वेगळी नवीन दिनचर्या सुरु करणे-

कोरोना वैश्विक महामारीला प्रतिबंधात्मक उपाय किंवा बाधितांची संख्या वाढू नये म्हणून सध्या टाळेबंदी घोषित करण्यात आलेली आहे. दोन ते तीन महिने झाले असतील आपण सर्व घरी बसून आहोत. अशा वेळी आपल्याकडे बराचसा वेळ शिल्लक राहिलेला राहतो. त्यामुळे या टाळेबंदीच्या काळात आपण आपली नेहमीची दिनचर्या बाजूला ठेवून एका नवीन दिनचर्येला नक्कीच सुरुवात करू शकतो.

६.पुरेशी विश्रांती घ्या-

एरवीच्या धकाधकीच्या जीवनात आपण कार्यालयीन कामांनी अगदी ग्रासून गेलेले असतो. त्यामुळे कित्येकदा जागरण होते आणि आपल्याला पुरेशी झोप मिळत नाही त्यामुळे टाळेबंदीच्या या कालावधीत आपण पुरेशी झोप घेवून आपले स्वास्थ्य कायम ठेऊ शकता.

७. वेगवेगळे छंद जोपासा.-

प्रत्येक माणूस कोणत्या न कोणत्या कलेत रमणारा असतोच. त्यामुळे टाळेबंदीच्या या कालावधीत आपण कोरोनाची भीती टाळण्यासाठी लेखन, वाचन, नृत्य, चित्रकला अशा विविध छंदांची जोपासना करू शकतो . ज्यामुळे वेळही जातो आणि आपल्याकडे असलेल्या कलेची आपल्याला नव्याने ओळख होते, एक प्रकारचं समाधान देखील प्राप्त होतं.                     

             

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

   

        


Comments