बाप्पा, खास तुझ्यासाठी
प्रिय बाप्पा
सप्रेम नमस्कार,
आता तुला नवीन काय सांगायचं ? तुला सगळंच
माहिती आहे. १४ कला आणि ६४ विद्यांचा तू अधिपती तुझ्यापासून ते काय लपून राहणार! बरोबर
१० दिवसांपूर्वी तू आलास २ ऑगस्टला आणि आज आहे अनंत चतुर्दशी. यंदाचे १० दिवस
पेट्रोलपेक्षा जास्त वेगाने उडून गेले असं वाटतंय. मार्च महिन्यापासून या कोरोनाचा जो काही कहर चाललाय
त्याचा आपल्या वारीवर परिणाम झाला. ते काही मनाला अजिबात रुचलं नाही. पण आता त्याचा
परिणाम तुझ्या उत्सवावर होईल असा विचार आमच्यासारख्या गणेशभक्तांच्या मनाला कधीच
शिवला नाही. सगळ्यांना याची नक्कीच कल्पना असेल की कोणताही सण म्हटला की एक वेगळंच
वातावरण आपोआप तयार होत असतं . ते वातावरण यंदा फार दिसले नाही. अगदी सांगायचंच
झालं तर मंडळाची वर्गणी नव्हती, त्यावेळचा तो गोड संवाद नव्हता, देखावे तयार
करतानाचा गोंधळ नव्हता ,मिरवणूक ,रथ अगदी काहीच नव्हतं. यंदा तू एकदम साधेपणाने
आलास रे आणि आज कसा चाललास ते कळतच नाहीय.
तू येणार म्हणून आनंद तर
होताच पण उत्साह मात्र खूप कमी वाटला. पुण्यनगरीच्या नदीकाठचे रस्ते जे कायम
तुझ्या येण्याची वर्दी देतात ते मात्र यंदा सुने सुने होते. कोणत्याच पथकाची
वादनाची तयारी सुरु नव्हती. ना कुठे ढोल घुमत होता ,ना त्याच्या
दोऱ्या आवळल्या जात होत्या, ना कुठे ताशाची तर्री ऐकू येत होती ना कुठे ध्वज
नाचवला जात होता. वादकांसह ऐकणारे देखील सगळंच मिस करत असतील. दिवसभर ढोल वाजवून
पाठीवर उठणारे वळ मात्र यावेळी वेळोवेळी त्यांची उणीव दाखवत होते. खऱ्या अर्थाने
वादनाचे चीज होतं ते तिथेच. यंदा ना ते भव्यदिव्य देखावे होते ,ना त्या मंडपातल्या
भल्यामोठ्या रांगोळ्या. सगळंच हरवल्यासारखं वाटत होतं.
दरवर्षी तू येतोस आणि बऱ्याच गोष्टी तुझ्याबरोबर येत असतात. तुझ्या येण्याची चाहूल जशी ढोल पथके देतात ना त्याचप्रमाणे आकाशवाणीवर लागणाऱ्या मखराच्या, मोदकासह इतर मिठाईच्या अशा बऱ्याच जाहिरातीदेखील ती देत असतात. हे घेतलं की ते मिळणार आणि हे सगळं घेतल्यावर कसं तुम्हाला परवडेल हा भाबडा सल्ला देखील यंदा कुणाला मिळाला नाही. यंदा तुझ्या सजावटीच्या छोट्या छोट्या गोष्टींनी भरलेली आणि ती अनंत गर्दी आपल्या पोटात सामाऊन घेणारी तुळशीबागही यंदा सुनी सुनी भासली. ना ती गर्दी होती, ना दुकानदाराबरोबरचा पैसे कमी करण्यासाठी घातलेला वाद होता. मंडळांमध्ये आणि सोसायट्यांमध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धा तर एक वेगळंच आनंद देऊन जायच्या. यंदा तेदेखील राहूनच गेलं. दरवर्षी घरी पाहुणे यायचे तुला पाहायला, तुझ्याकडे आशीर्वाद मागायला. त्या लांबच लांब आरत्या आणि येई ओ विठ्ठले ला बेंबीच्या देठापासून श्वास संपेपर्यंत घेतलेली तान अजून आठवते आहे. जिल्हाबंदी असल्याने पाहुणे काही आले नाहीत, तू होतास परंतु ती तान काही तितक्या वर यंदा गेलीच नाही. यंदा वेळ भरपूर होता पण त्या रात्र रात्र चालणाऱ्या गप्पा यंदा मात्र कुठेतरी गायबच झाल्या.
मला पुणे हे शहर आवडण्यामागे
बरीच कारणे आहेत ; मग ती बेडेकरांची मिसळ असेल, जोश्यांचा वडा असेल किंवा चितळ्यांची
बाकरवडी किंवा दैदिप्यमान इतिहास असेल किंवा आकर्षक असं वातावरण आणि शहररचना असेल.
पण या सगळ्यांबरोबरच एक कारण अजून आहे , आणि ते म्हणजे बाप्पा तू. अरे एकट्या
पुण्यात तुझी कितीतरी रूपे आहेत. कसबा,
तांबडी जोगेश्वरी, भाऊ रंगारी, गुरुजी तालीम, तुळशीबाग, दगडूशेठ आणि असे बरेच. विसर्जन
मिरवणुकीला लक्ष्मी रोडवर अंग मोडेस्तोवर नाचणं आणि गर्दीतून वाट काढत काढत तुझी
रूपं न्याहाळणं आज आमच्यातला प्रत्येकजण आठवतोय. यंदा अंगावर ना गुरुजी तालीमचा
गुलाल पडला ना भाऊ रंगारीचा भंडारा.
मान्य आहे यंदाच्या वर्षी तू साध्यापणाने
आलास आणि आज आमचा निरोप घेऊन माघारी निघालास ही. पण बाप्पा, आम्ही दरवेळी म्हणतो पुढच्या वर्षी लवकर ये; परंतु
यंदा मात्र आमची या वाक्याची तीव्रता जरा जास्तच आहे. तू मात्र नक्की पुढच्या
वर्षी जरा लवकर ये , अगदी थाटामाटात. तेव्हा नक्कीच हे सावट महाराष्ट्रासह
भारतावरून दूर झालेले असेल आणि पुन्हा एकदा आम्ही तुझ्या स्वागताची तयारी करत असू,
एका नव्या उत्साहाने, नव्या जोमाने.आणि मग मात्र पुन्हा ताशाची तर्री गगनात घुमेल,
ढोलाचं टीपरू आभाळाकडे सरसावेल आणि पुन्हा
भगव्या ध्वजा दिमाखात फडकतील.
बहुत काय लिहिणे…
इति लेखनसीमा
तुझ्या आगमनासाठी आतुर असलेला तुझा एक भक्त….



Comments
Post a Comment